श्री चैतन्य शिक्षामृत (Sri Chaitanya Shikshamrit)
Author: कृष्णकृपामूर्ती श्री श्रीमद् ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद
Description
प्रेमावतार श्री चैतन्य महाप्रभूंनी हरिनाम संकीर्तन केले, नृत्य केले, भगवत्प्रेमाच्या भाव-लहरींवर आरूढ होऊन अखिल विश्वाला कृष्णप्रेमाने आप्लवित केले. नगर-नगर आणि ग्रामा-ग्रामातून ‘हरे कृष्ण’ महामंत्राचा गजर करून कृष्णप्रेमाचे वितरण केल्यामुळे श्री चैतन्य महाप्रभू प्रसिद्ध आहेतच; परंतु एक तत्त्वज्ञानी म्हणून त्यांची ख्याती निदान महाराष्ट्रात तरी अल्प आहे. वस्तुस्थिती मात्र अशी आहे की, आज संपूर्ण जगत पाचशे वर्षांपूर्वी श्री चैतन्यांनी प्रतिपादन केलेल्या अचिंत्य भेदाभेद तत्त्वाचा स्वीकार करीत आहे. त्यांच्याच शिष्यपरंपरेतील महान आचार्य आणि इस्कॉनचे संस्थापकाचार्य कृष्णकृपामूर्ती ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, या ग्रंथामध्ये हरिनाम संकीर्तनामागचा गूढ आध्यात्मिक सिद्धांताचे रहस्योद्घाटन करीत आहेत. रूप, सनातन या प्रकांड विद्वान बंधूंना भक्ती, तिची प्राप्ती, भगवदावतार, भगवदैश्वर्य, भक्तांचे गुण याविषयी महत्त्वाचा उपदेश श्री चैतन्यांनी दिला. प्रकाशानंदांसारख्या मायावादी संन्याशाशी प्रदीर्घ चर्चा केली व त्यांना श्री शंकराचार्यांच्या कार्यामागची सत्य कारणे सांगून नामसंकीर्तनात प्रवृत्त केले; जगन्नाथ पुरीतील सार्वभौम भट्टाचार्यांशी चर्चा करून त्यांना साकार व निराकार साक्षात्कार, प्रणव माहात्म्य इत्यादी विषयांवर दिव्य उपदेश दिले. श्री चैतन्य महाप्रभू आणि त्यांचे नित्य पार्षद श्रील रामानंद राय यांच्यात झालेल्या संवादाला तर उपमाच नाही. सर्वोच्च भावना, विशुद्ध कृष्णप्रेम, श्रीमती राधाराणीचे उज्ज्वल माधुर्य आणि श्री श्री राधाकृष्णांच्या प्रेमाचे परमोच्च स्थान अशा विषयांवर चर्चा करून त्यांनी अद्भुत ज्ञानाचे भांडार उघडून दिले आहे. या ग्रंथाच्या गंभीर अध्ययनामुळे आपल्या अंतःकरणात अज्ञानांधकाराचा नाश करणारा व दिव्य आनंद प्रदान करणारा श्रीकृष्णप्रेमरूपी भास्कर उदय पावेल.
Sample Audio